त्रिविध तापहारक हे गुरूपाय।
भवसिंधुसि तारक हे गुरुपाय ।
स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय।
ज्ञानाचे निजगुज हे गुरूपाय।
भक्तिपंथासि लाविती हे गुरूपाय।
नयनी श्रीराम दाविती हे गुरूपाय ।
सहज शांतीचे आगर हे गुरूपाय।
सकल जीवासी पावन हे गुरूपाय ।
नमस्ते माझ्या मित्रमैमिणीनों,
आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. जो मी तुमच्या सर्वां सोबत शेअर करतेय. खरंतर मी फक्त एक सामान्य माणुस म्हणुन मला जे वाटते, जे डोक्यात विचार येतात आणि घोळत राहतात तसेच मला आलेल्या अडचणी, अनुभव आणि मी माझ्या व माझ्या कुंटुंबाच्या सुखासाठी प्रयत्न करताना झालेल्या चुका, यश, अपयश, मते आणि हे सगळे आपल्याशी बोलण्याची इच्छा झाली म्हणून ब्लॉग लिहायला घेतला. उद्देश इतकाच की, यातुन वाचणा-या व्यक्तींना त्यांच्या सुखासाठी मार्ग मिळावा, अडचणींवर मात करता यावी, म्हणजे, “पुढच्यास ठेच मागचा शहाणा !” असे काहीसं.
आपण आयुष्यात पुढे जाताना प्रत्येक टप्यावर कोणी ना कोणी गुरु असतोच जसे आई, वडिल, भाऊ, बहिण, आजी, आजोबा, मित्रमैत्रिणी, जवळचे नातलग, शाळेचे शिक्षक, आणि एखादा प्रसंग घडताना काहीतरी शिकवून जाणारी प्रत्येक व्यक्ति, मग ती लहान असो वा मोठी. आयुष्यात येणारे सगळे प्रसंग देखील काहीतरी शिकवण देणारेच असतात. पण खरंच आपण काही शिकलो का ? या सगळ्यातून, काही बोध घेण्याचा प्रयत्न करतो का ? अरे हो मला हेच म्हणायच होत, “आपण जर आलेल्या प्रसंगातून, अनुभवातून काही चांगले, सकारात्मक , शिकलो तर येणा-या पुढच्या अनुभवाना सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये हळू हळू जमा व्हायला लागते.” म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात येणारी चांगली वाईट सर्वच परिस्थिती आपल्याला सुख दुःख देऊन जाते. पण यातुन आपण काय घेतो हाच खरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण चांगली आणि सुखाची परिस्थिती आली की, आपण इतके हुरळून गेलेलो असतो की जे सुख आलेय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच आलेय असे वाटुन आपण आपल्याच बढ़ाया सांगत राहतो. याऊलट थोडेसे जरी दुःख मिळाले, प्रसंग आला की आपण परमेश्वराला दोष द्यायला सुरवात करतो, “माझ्याच वाट्याला का ? सगळ्या जगात मीच सापडलो का तुला ? अजून किती परिक्षा घेशील ? वगैरे वगैरे.” खरंच आपण किती स्वार्थी विचार करतो ना ? चांगले झाले, सुख मिळाले की माझ्यामुळे आणि दुःखाचे प्रसंग आले की ते भगवंतामुळे, दुस-यामुळे असे ठरवून टाकतो.
आपण हे कधीच पाहत नाही की येणारे सुख दुःख हे आपल्याच चुकीच्या व बरोबर कर्मांचा परिपाक असतात. खूप वरवर आपण या गोष्टींना बघतो आणि बोलत राहतो, प्रतिक्रिया व्यक्त करतो. तुम्ही म्हणाल हे कसे काय बरं, पण मी जे म्हणतेय ते अगदी बरोबर आहे. आणि पडताळून पहायचच असेल तर एक साधे उदाहरण बघू , आपण रस्त्यांनी चाललोय आणि चालता चालता एका दगडाला ठेचकाळुन पडतो आणि आपल्याला लागतं तेंव्हा आपण बोलून जातो अरे रस्त्यात दगड मध्येच कुठुन आला, माझ्याच रस्त्यात मध्ये यायचा होता का ? इत्यादी. पण बघायला गेलं तर देवाने बुद्धि दिलीय ती माणसाला दगडाला नाही. त्यामुळे तो दगड रस्त्यात मध्येच आहे याची तक्रार करण्यापेक्षा आपणच सावधपणे पावले टाकत असतो तर पडलो नसतो. म्हणजेच काय तर आपले कर्मच आपले चांगले व वाईट निश्चित करतात.
त्याचप्रमाणे आपले भोग, भाग्य, फलप्राप्ती इत्यादी आणि हे सगळे आत्ताच्या आणि मागील जन्मातील आपल्या काया वाचा मनोभावे केलेल्या कर्माचे फलित असते. हिच कर्मफले, आपण कर्माचे शास्त्रानुसार अगर अध्यात्मानुसार म्हणा अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक ताप या रुपात भोगत असतो. मग प्रश्न पडेल की आता हे कमी करण्यासाठी अगर चांगल्या फलप्राप्तीसाठी काय करावे ? म्हणजे भोग कमी होतील आणि भाग्य उजळेल. या सर्वांसाठी एकमेव पर्याय म्हणजे “भगवतभक्ती”. पण ती आपल्या कडुन योग्य रितीने घडली पाहिजे. आता पुन्हा प्रश्न की, “म्हणजेच आपण जी भक्ती करतोय ती योग्य नाही का ? आणि योग्य भक्ती कशी करायची ? ” अशा भक्तीसाठी त्याचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि हे ज्ञान मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे “सद्गुरू चरण” ठामपणे धरणे. फक्त आणि फक्त सदगुरुच आपल्याला आपली स्वतःची, आपल्या योग्य अयोग्य कर्माची, तसेच भगवंताची, भक्तीची ओळख करून देवून, त्या योग्यतेच आपल्याला बनवू शकतात. योग्य भक्ती कशी करायची, यासाठीची साधने काय आहेत ? हे फक्त सदगुरुच सांगु शकतात. अशा भक्तीसाठी लागणारा विवेक आणि जाणीव ते आपल्यामध्ये आणतात. भगवंत कसा आणि तो कसा मिळवायचा हे सहजसोप करून दाखवून ते आपल्यामध्ये उतरवतात.
श्री सद्गुरू, अशा सवयी लावुन देतात की त्यायोगे भौतिक तसेच अध्यात्मिक प्राप्ती ही ठरलेलीच असते. संत रामदास तर हे सांगतात की, यमयातना खात्रीने चुकवायच्या असतील तर लवकरात लवकर सद्गुरु चरणांचा आश्रय घेतला पाहिजे. त्यांच्यावर पूर्ण विश्वास व निष्ठा ठेवून त्यांनी सांगितलेल्या साधनांचा वापर प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे करून, त्यांच्यासमोर संपूर्ण सर्व भावबंधातून नतमस्तक झाले की ते आपली जिवननौका पार लावतातच.
खरंच हे करा आणि मला सांगा.
तुम्ही निश्चित समाधान आणि सुख शांती मिळवाल हा माझा विश्वास आहे. पुढच्या भेटीपर्यंत खुश रहा, मस्त रहा, आनंदी रहा.

सद्गुरू वाचोनी सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।
भेटू लवकरच. . .

Leave a Reply to Amruta Mirje Cancel reply